आपली गरज प्रदुषणाचे कारण

 आपल्या दैनंदिन कारणासाठी आपण काहीनाकाही विकत घेत असतो. खरेदीच्या माध्यमातून आपण पर्यावरणाला कचरा भेट म्हणून देतो. श्वास घेऊन कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो अगदी तसाच कचरा आपण निर्माण करतो. कार्बन डाय ऑक्साईड झाडांची गरज ठरतो पण खरेदीतून निर्माण झालेला कचरा कोणाची गरज ठरतो? बाजारातील कंपन्या आपल प्रॉडक्ट युजफुल करण्यापेक्षा ते अट्रॅक्टीव्ह बनवतात. त्या प्रॉडक्टच्या अट्रॅक्टीव्हनेस मधूनच चिरकाळ टिकणारा कचरा निर्माण होतो. मेट्रोपॉलिटन, कॉस्मोपॉलिटन शहरांचा चकचकीत भाग पहाण्यापेक्षा त्या शहरांचे डंपिंग यार्ड नक्की बघा.


आपण उर्जा स्त्रोतांची निर्मिती थांबवू शकत नाही पण आपण त्याला मर्यादा तर आणु शकतो. भाजी, फळे, कपडे विकत घेताना आपण प्लास्टिकच्या बॅग्ज प्लास्टीक वेश्टन तर नाकारू शकतो. विज उपकरणांच्या वापराला आळा घालून विजेचा अपव्यय टाळू शकतो. एकासाठी एक कार पेक्षा विस लोकांसाठी एका बसचा वापर करू शकतो. जगभरात फेकण्यात जाणाऱ्या अन्नाच प्रमाण अन्न उत्पादनाच्या एक त्रुतियांश आहे. या एवढ्या मोठ्या अन्न नासाडीची कारणे भिन्न आहेत. सप्लाय चेन मध्ये केली जाणारी हेळसांड, प्रॉपर रेफ्रिजरेटर्सच्या अभावापासुन ते लोकांच्या अनियंत्रित अन्न ग्रहणाच्या सवईपर्यंत. आजच्या प्रगत जगामध्ये भुकबळी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. हि संख्या तितकीच आहे जेवढी जागतिक महामारीचा मृत्युदर. लग्नसमारंभ, विविध मेजवाण्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या द्वारे होणारी अन्न नासाडी आपण नक्कीच थांबवू शकतो. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या कँटिनमधे जनजागृती करून अन्नाच महत्त्व सांगुन त्याचा नाश होण्यापासून आपण ते अन्न वाचवू शकतो. अन्न संरक्षणाचे महत्व हे प्राथमिक शिक्षणातून लहान मुलांना शिकवणे आवश्यक आहे. कारण अन्न नासाडी केवळ अन्न पदार्थांचा अपव्यय नसुन त्याला लागणाऱ्या प्रत्येक घटक संसाधनांचा अपव्यय आहे. अन्न फेकणाऱ्या प्रत्येकाने या सर्व बाबींचा विचार करून पहावा. फुडवेस्ट मॅनेजमेंट हि काळाची गरज आहे. कारण आपल्या जवळ संसाधने आणि स्त्रोत हे अत्यल्प आहेत आणि हे सुर्यकिरणांइतकेच सत्य आहे. 


 सरकारने पोषण आणि पर्यावरण या दोन घटकांचा समन्वय साधावा जेणेकरून जितकी गरज तेवढेच उत्पादन सुरू होईल. टेक्सटाईल इंडस्ट्री जी कपडे उत्पादन करते पण विश्वास ठेवा या इंडस्ट्रीने भारतातील प्रदुषण उत्पादनात तिसरे स्थान मिळविले आहे. या इंडस्ट्री मुळे जल, स्थल आणि वायु अशा सर्व माध्यमातून प्रदुषण होत असत. हे प्रदुषण सुद्धा आपण थांबवू शकत नाही पण आपण त्याला आळा नक्कीच घालू शकतो. गरजे पुरते कपडे आणि फॅशन नावाच विष नष्ट करून. वस्त्रोद्योगात चिंध्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, आपण त्या अतिरिक्त कपड्यांतुन ड्रेस मटेरियल आरामात निर्माण करू शकतो तसे संशोधन करायला हवे, कपडा कारागिरांना प्रशिक्षण द्यायला हवे. 


आपण आपल्या गरजा कमी करू शकलो तर फारच उत्तम कारण गरजांचा सरळ संबध मानसिक तनावाशी आहे पण त्याही पेक्षा त्याचा सरळ संबंध पर्यावरणाच्या स्वास्थ्याशी आहे. एक मात्र निश्चित आजच्या जागतिक पर्यावरण हानीला आपली वैयक्तिक गरजच कारणीभूत आहे.

४/०५/२०२१

©® अनिरुद्ध महेंद्र तळणीकर

©® Aniruddha Talnikar

Comments